नमस्कार पालक मित्रांनो,
इतर अनेक नात्यांना जसे प्रेमाचे आणि संस्काराचे खतपाणी घालावे लागते अगदी तसेच आई-वडिल आणि मुलांमधील नातं घट्ट करण्यासाठी देखील काही गोष्टी पालकांना आवर्जून कराव्या लागतात. सध्याच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक पालकांचे आपल्या मुलांकडे होणारे दुर्लक्ष एक मोठी समस्या बनली आहे. कारण मुलांना गरज असतानाच जर पालक जवळ नसतील तर अशाने पालक आणि मुलांमधला दुरावा वाढत जाऊन खूप मोठे रूप घेऊ शकतो. मुलं आपल्या पालकांचा राग करू शकतात. त्यांच्या मनात आपल्या आई वडिलांविषयी काहीच प्रेम राहणार नाही. आणि अश्या अनेक घडलेल्या घटना आपण ऐकल्या असतीलच. म्हणून वेळ असतानाच वेळात वेळ काढून आई वडिलांनी मुलांना शक्य तितका वेळ द्यायला हवा. पण कामातच सगळा वेळ जातो मग कसा वेळ देणार? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास सवयी, ज्या पालकांनी स्वत:ला लावून घ्याव्यात. या सवयी तुम्ही स्वत:ला लावल्यात तर तुमचे आणि तुमच्या मुलांमधील नाते नक्कीच अधिक घट्ट होईल. चला तर पाहुयात ३ अश्या टिप्स ज्यामुळे आपण आपल्या मुलांसोबतचे नाते अधिक घट्ट आणि उत्तम बनवू शकतो.
१) एकत्र जेवायाला बसा.
एका संशोधनानुसार हे दिसून आले आहे की मुलांसोबात जेवायला बसल्याने ते आपल्या आईवडिलांच्या आहारा सबंधितच्या सवयी आत्मसात करतात. जेवताना तुम्ही ज्या गोष्टी कराल, जे संवाद साधाल ते मुलं मन लावून ऐकतात, त्यांची मानसिक जडणघडण उत्तम होते. पालक व मुलांमध्ये आचार, विचार आणि प्रेमाची भावना निर्माण होते. या शिवाय योग्य आहार घेतल्याने शारीरिक स्थिती सुद्धा तंदुरुस्त राहते. त्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही किमान रात्रीच्या वेळेस तरी एकत्र जेवायला बसायला हवे.
२) रोज प्रेमाने बोला.
व्यक्ती कोणताही असो तुम्ही त्याच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललात तर त्या व्यक्तीला खूप छान वाटतं. मुलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक खास होते जेव्हा त्यांचे पालक त्यांच्याशी रोज न चुकता प्रेमाने बोलतात, वागतात, त्यांचे लाड करतात तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्याकडून एखादी चूक जरी झाली तरी ते न लपवता तुम्हाला सगळं खर खर सांगितलं. त्यामुळे मुलांशी शक्य तितके छान राहण्याचा प्रयत्न करा. चूक झाली तर ओरडण्यापेक्षा जवळ घेऊन समजवा. त्यांना याची जाणीव करून द्या की तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे.
३) एकत्र खेळा.
मुलांसोबत एकत्र खेळणे ही पालकांसाठी अतिशय उपयुक्त सवय आहे. मुलं आपल्या मित्रांसोबत नेहमीच खेळतात पण आपल्या आई वडिलांसोबत खेळण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. तो त्यांना द्या. खेळण्याच्या स्पर्धेतून तुमच्या दिशेने असणारी त्यांची ओढ अधिक वाढते. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढून त्यांच्यासोबत खेळताय ही गोष्ट ते खूप वेळ लक्षात ठेवतात आणि त्याबद्दल त्यांना तुमच्याविषयी खूप प्रेम वाटत असते. त्यामुळे मुलांसोबत शक्य तितके एकत्र खेळा. घरात शक्य नसल्यास कधीतरी पिकनिकला जाऊन त्यांना तो आनंद द्या.
मुलांशी मायेचं नातं ठेवण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्यांच्याशी शक्य तितकं मायेने वागणे. त्यांना खूप प्रेम देणे. तुम्ही त्यांच्यासोबत आहात ही गोष्ट त्यांना वारंवार सांगणे. आणि हो या सर्व गोष्टी कुठलीच अपेक्षा न ठेवता अगदी निर्मळ मनाने करून बघा आणि मुलांचा काय प्रतिसाद येतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
धन्यवाद!!!!
Comments
Post a Comment