उत्तम शिक्षक बनण्यासाठी ५ जबरदस्त गुण

उत्तम शिक्षक बनण्यासाठी ५ जबरदस्त गुण


आज कालच्या बदलत चाललेल्या युगासोबत शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. त्याच बरोबर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा प्रचंड बदल झालेला दिसतो. हातात छडी घेऊन शिकवणारा शिक्षक आज मुलांना डिजिटल पद्धतीने शिकवताना आपल्याला दिसतो. तर या आधुनिकतेच्या काळात एक शिक्षक म्हणून कोणत्या गोष्टी स्वतः मध्ये असल्या पाहिजेत ते आज आपण या ब्लॉग मधून पाहणार आहोत.



नमस्कार, 


मी श्रुती कांबळे. गेली ५ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे आणि माझ्या अनुभवातून काही गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे. 


मुलांच्या सवयी आणि पालकांचे वर्तन या सगळ्या बरोबर आज शिक्षकांना स्वतःला ऍडजेस्ट करावे लागते. आजूबाजूचे वातावरण आणि बदलत जाणारे राहणीमान याचा भरपूर परिणाम शिक्षकांवर पडला आहे. जर यामध्ये तुम्हाला एक उत्तम शिक्षक बनून नवीन पद्धतीने मुलांना घडवायचे असेल तर खालील काही गुण तुम्ही नक्कीच आंगिकारले पाहिजेत. 

१) संयम :

 

मुलांचा वाढता हट्ट आणि तक्रारी या गोष्टींना एक शिक्षक म्हणून संयमाने हाताळणे खूप गरजेचे असते. फक्त आगवूपणा हाताळतानाच नाही तर मुलांना शिकवताना सुद्धा प्रत्येक मुलांची क्षमता ही वेगवेगळी असते. काही मुलांना खूप लवकर समजते तर काही मुलांना थोडा वेळ द्यावा लागतो एकच गोष्ट खूप वेळा समजावून सांगावी लागते. अशा वेळेस संयम दाखवणे खूप गरजेचे असते.


२) सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) :


आधी मुलांना फळ्यावर एक चित्र काढून आणि काही कथा रंगवून सांगितल्या तरी त्यांना खूप आनंद व्हायचा. पण आज कालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये मुले खूप नवीन गोष्टी बघतात. त्या पद्धतीच्या प्रमाणे मुलांना शिकवणे गरजेचे असते. प्रत्येक दिवशी मुलांच्या डोक्यात असणाऱ्या हजारो प्रश्नांची उत्तरे कोणत्याही नवीन पद्धतीने समजावणे महत्त्वाचे झाले आहे. एखादा पाठ शिकवताना त्या सोबत नवीन काहीतरी मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी शिक्षकांना सृजनशील असणे आणि नवीन नवीन गोष्टी तयार करून मुलांना शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले खूप चांगल्या पद्धतीने आनंदाने शिक्षणाचा आनंद घेतात.


३) स्वत शिकण्याची तयारी :


एक शिक्षक म्हणून सर्वात महत्त्वाचा गुण जो मला वाटतो तो म्हणजे नेहमी शिकत राहणे. कोरोना काळामध्ये ज्या शिक्षकांना व्हॉट्स ॲप सुद्धा वापरता येत नव्हते त्या शिक्षकांनी सर्व प्रकारच्या टेक्निकल गोष्टी शिकून मुलांना शिकवल्या. तर अश्याच प्रकारे एका शिक्षकाने नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत आणि पुढच्या पिढीला शिकवत राहिल्या पाहिजेत. 


४) आदर :


ज्या वेळेस तुम्ही एक शिक्षक म्हणून काम करता त्या वेळेस तुम्हाला शाळा, विद्यार्थी, पालक, तुमचे सहकारी आणि तुमचे काम यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर असणे खूप गरजेचे आहे. कारण या क्षेत्रामध्ये हिच गोष्ट तुम्हाला एक उत्तम पिढी घडवण्याची ताकद देते. हजारो प्रकारचे पालक आणि तसेच या प्रवासात मिळणारा प्रत्येक व्यक्ती यांच्या कडून आपण नेहमी खूप काही शिकत असतो तर त्याचा आदर करणे गरजेचे आहे. 


५) संवाद कौशल्य :


उत्तम संवाद कौशल्य हे उत्तम शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. हा संवाद विद्यार्थी आणि शिक्षक यांमध्ये वेगवेगळा असतो, पालकांसोबत वेगळा असतो. या सर्वांचा ताळमेळ घालून उत्तम आहे तेच सर्वांपर्यंत पोहोचविणे हे शिक्षकाचे खूप महत्वाचे काम असते.


जर तुम्हाला एक उत्तम शिक्षक बनायचे आहे तर वरील गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने शिकणे आणि वापरणे गरजेचे आहे. मी या गोष्टी उत्तम पद्धतीने कशा शिकले आणि कशा वापरते हे जाणून घ्यायचे आहे तर नक्कीच आपण या प्रत्येक मुद्द्याबद्दल डिटेल मध्ये माहिती पुढील ब्लॉगमध्ये नक्की घेऊ. तो पर्यंत वरील गुणांवर नक्की  काम करायला सुरुवात कराल याची खात्री आहे. कारण देश घडवणारी एक उत्तम पिढी घडवण्याची जबाबदारी एक उत्तम शिक्षक म्हणून तुम्ही पार पाडू शकता.


धन्यवाद!!

श्रुती कांबळे

Comments