मकर संक्रात साजरी करण्यामागची संस्कृती व खरा अर्थ

मकर संक्रात साजरी करण्यामागची संस्कृती व खरा अर्थ


सण म्हटल की आपल्या सगळ्यांमध्येच उत्साहाची आणि आनंदाची लाट असते. वर्षभर सणांनंतर सण येतातच. सगळेच सण खूप निरनिराळ्या प्रकारचे असतात त्याचप्रमाणे तो सण साजरा करण्यामागे सुद्धा तशीच काही वेगळी कारणे आहेत. आणि ती पालकांनी आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत तरच आपल्या सण साजरे करण्यामागच्या उद्देशाला व संस्कृतीला आपण पुढच्या पिढीपर्यंत जिवंत ठेवू शकतो.  

आज आपण अशाच एका महाराष्ट्रातील उत्तम सणाबद्दल बघणार आहोत. या सणाच्या दिवशी हल्लीच्या पिढीला ज्या  रंगाचे कपडे सर्वात जास्त घालण्याची इच्छा असते, कपड्यांमध्ये बऱ्याच जणांचा आवडता रंग असतो हा. त्याच एक मात्र रंगाचे कपडे या दिवशी सगळे घालतात.  
ओळखलात ना कोणता तो सण? 
हो बरोबर "मकर संक्रांत". चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांत साजरा करण्यामागे नक्की काय तात्पर्य आहे. 


१) मकर संक्रांत सण कसा साजरा केला जातो :-


सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नक्की मकर संक्रांत कशी साजरी केली जाते. कारण या सगळ्या मागे हे का साजरे करायचे याचे रहस्य लपले आहे. संक्रांतीच्या आधी आदल्या दिवशी "भोगी" असते. म्हणजेच त्या दिवशी जेवणामध्ये विशेष पदार्थ तयार केले जातात आणि अगदीच वेगळ्या पद्धतीच जेवण असतं. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, मिसळची भाजी (मिक्स भाजी), मुगडाळीची खिचडी, गुळपोळी, तिळगुळाची वडी आणि असं बरंच काही जसं जसं आपण महाराष्ट्राच्या भागांकडे बघतो तस तसंच त्या दिवशी जेवणाच्या पानांमध्ये पदार्थ वेगवेगळे असतात पण हे सगळे पदार्थ कॉमनच आहेत. 

तसा हा सण सवाष्णींचा असतो असं सुद्धा म्हणतात.  म्हणून त्या दिवशी एका सवाष्णीला जेवायला बोलावलं जातं. तिला हे सगळे पदार्थ दिले जातात. आणि नंतर तिची ओटी भरली जाते. त्या ओटीमध्ये तिला गहू, ऊस, तिळगुळ, पीठ, गाजर, वांगी, ओल्यापातीचा कांदा, एखादी उपयोगी वस्तू, दक्षिण, कापूस, तेल, वस्तू, परत तिळ आणि गूळ वेगवेगळे, तिळगूळांची बनवलेली वडी अश्या अनेक गोष्टी असतात. या गोष्टींनी ओटी भरतात. 

दुसरा दिवस हा संक्रांतीचा असतो. 
सर्व परिवार काळ्या रंगाचे कापड असलेलच वस्त्र घालतात. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच. लहान मुलांसाठीतर एक वेगळी वेशभूषा सुद्धा असते. आणि ती म्हणजे हलव्याचे दागिने (तिळगूळांचे दागिने). वर्षभर असा कुठलाच सण आपण बघितला नसेल ज्यामध्ये अन्नपदार्थापासून दागिने बनवले जातात. 


लहान मुलांसाठी किरीट, बांगड्या, गळ्यातलं, कंबर पट्टा, पायातल्या वाळ्यांप्रमाणे सुद्धा दागिने बनवले जातात. आणि ही प्रथा पूर्वीपासून भारत देश किती श्रीमंत होता याचे प्रमाण देते. त्यानंतर संध्याकाळी पूर्ण परिवार एकत्र येतो. एकमेकाला संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. आणि एकमेकांच्या हातावरती तिळाची वडी म्हणजेच तीळ आणि गूळ एकत्र केलेली एकदम गोड गोड वडी हातावर ठेवतात आणि म्हणतात 
 "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला".
जर कोणी समोर मोठे लोक असतील वयाने किंवा पदानी तर त्यांना नमस्कार केला जातो. आणि ते सुद्धा असा आशीर्वाद देतात की तुझं आयुष्य तीळ आणि गुळाप्रमाणे असंच गोड राहू देत. यानंतर पूर्ण परिवार एकत्र वेळ घालवतो. हे आपण बघितलं की सण साजरा कसा केला जातो.  

२) आपण पाहूयात नक्की हा सण साजरा करण्याचे  काय उद्देश आहे आणि त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन 



 
आपण खरं तर यामध्ये उद्देश आणि वैज्ञानिक कारण सुद्धा बघणार आहोत. आपण जर निरखून बघितलं तर एक गोष्ट सतत स्पष्ट होईल. भारतातला कुठलाही सण साजरा करण्यामागे ही दोन कारणे महत्त्वाची ठरतात. वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं तर लक्षात येतं आदल्या दिवशी जो भोगीचा कार्यक्रम केला जातो त्यामध्ये मिसळची भाजी असते ही भाजी आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्यांचे गुण एकाच दिवशी देते. मग बाजरीची भाकरी ती सुद्धा तीळ लावलेली या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्यासाठी पौष्टिक असते. सगळ्यात महत्त्वाचं तीळ आणि गूळ हे नाव तुम्ही सुरुवातीपासून वाचत आला या पदार्थाशिवाय संक्रांत अपुरीच. या दोन पदार्थांपासून तयार झालेली गोड वडी आपल्यासाठी थंडीच्या दिवसात उष्णता निर्माण करण्यासाठी आहे. तिळापासून तेल सुध्दा बनते, मग या थंडीच्या दिवसांमध्ये हे तिळ  अश्या मिश्रणासोबत खाण्याने आपली त्वचा माऊ रहायला लागते. या दिवसांमध्ये  त्वचा वाळणे किंवा फुटण्याची शक्यता कमी होते. पूर्वी आज पेक्षा भरपूर थंडी असायची कारण झाडं झुडपं सुद्धा तेव्हा बरीच होती जी आता दुर्मिळ आहेत. आणि त्यामुळेच पूर्वी भरपूर थंडी असायची. पण आता सुद्धा ही वडी, या दिवसांमध्ये आपण खाल्ल्यानंतर आपली उष्णता वाढून थंडीने होणाऱ्या आजारांपासून आपल्याला वाचवते. ते कस काय? तर यामध्ये असलेल्या गूळामूळे. गूळ उष्णता वाढायला उत्तम मदत करतं. आणि शरीराची उष्णता वाढली की थंडीमध्ये होणारे आजार कमी होतात. पण उष्णता असलेल्या लोकांनी ही वडी जास्त नाही खायची.  

आता बघूया नक्की उद्देश सुद्धा काय आहे. भोगीला पण आपण बघितलं की एक सवाष्ण बाई असते आणि तिची आपण ओटी भरतो. तिला निरनिराळ्या गोष्टी दिल्या जातात आणि त्या मागचा स्पष्ट उद्देश असा असतो की ती बाई गरीबच असावी. त्या दिवशी अशाच सवाष्णीला बोलवून या सगळ्या गोष्टी ओटी मधून दिल्या जातात. जर तुम्ही ओटीच सामान नीट वाचल असेल तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल की तिला ही केलेली एक मदतच आहे. त्यामध्ये जवळजवळ दररोज लागणारी सगळी अन्नसामग्री ही आहेच. परत संध्याकाळी एकसारख्या रंगाचे कपडे घालून पूर्ण परिवार एकत्र येतो. आता काळ्या रंगाला खरं तर अशूभ मानल जात मग तरीही काळेच कपडे कसे काय? याचे कारण वैज्ञानिक आहे. पूर्वी इतर दिवसांमध्ये पांढरा किंवा वेगळ्या पण थोडया हलक्या रंगाचे कपडे घालण लोक पसंत करायचे. कारण काळ्या रंगाचे कपडे शरीराला उष्णता निर्माण करायला मदत करतात. पण मग खास करून थंडीमध्येच हा रंग जास्त उपयुक्त ठरतो. महाराष्ट्रात ३ प्रकारे वातावरणात फरक पडतो. पण बाकी २ प्रकारात उष्ण तापमान जास्त आहे आणि या वातावरणात जर काळे कपडे घातले तर उष्ण तापमानात उष्णता वाढून खूप विचित्र परिस्थिती होते शरीराची. म्हणून काळा रंग इतर ऋतूंमध्ये अशुभ पण पौष महिन्यातल्या थंडीसाठी शुभ मानला जातो. आणि संक्रांतीला परिधान केला जातो.  

या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, गप्पागोष्टी करतात तिळगुळ घ्या गोड बोला अश्या शुभेच्छा देतात याप्रमाणे तुमच आयुष्य सुद्धा गोड राहू दे असा आशीर्वाद देतात. अशा वातावरणामध्ये अशा प्रकारच्या बोलण्यामुळे या शब्दांमुळे नातेसंबंध अजून मजबूत होतात. एकत्र निवांत वेळ घालवायला मिळतो, जो दररोजच्या शेड्युलमधून मिळणे कठीणच असते. या दिवशी जर कोणाची भांडण असतील तर तिळगुळ देऊन आणि गोड बोल असं सांगून या दिवशी ही भांडण सुद्धा मिटतात. मग हा सण म्हणजे आपल्यासाठी बेस्ट चान्स आहे त्या व्यक्तीसोबत जाऊन बोलण्याचा ज्या व्यक्तीशी तुम्ही दुरावला असाल. या सणाला थोडासा निगेटिव्ह नाव सुद्धा दिल गेल होत खरंतर. कारण तुम्ही कधीतरी हे ऐकलं असेलच "चांगल्या कामावर संक्रांत आणू नकोस!"  पण खरंतर या वाक्याचा अर्थ असा आहे की, संक्रांत हा सण पौष महिन्यात असतो आणि पूर्वीपासून ही प्रथा आहे की पौष महिन्यामध्ये कोणतेही महत्त्वाचे काम जर असेल किंवा लांब अंतरावरच जर काम असेल तर ते करू नये. कारण ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा जास्त वेळासाठी जर ते काम करावे लागणार असेल तर थंडीच्या वातावरणात त्या माणसासाठी कठीण जाऊ शकतं. म्हणून त्यांना ते काम नाही केलं पाहिजे असं सांगितलं जायचं. थोडक्यात पौष महिन्यात जवळची कमी महत्त्व असलेली काम करून घ्यायची आणि परिवारासोबत वेळ घालवायचा. या दिवसातले वातावरण थंडगार असते म्हणजेच हवेचा वेग सुद्धा जास्ती असतो. म्हणूनच मग पूर्वी एकत्र येऊन अशा हवामानात  पतंग उडवण्याची स्पर्धा असते कारण या दिवसांमध्ये पतंग अगदी उत्तम प्रकारे उडवता येते. अशी स्पर्धा एक वेगळीच  उल्हासाची लहर घेऊन येते. याप्रमाणे पूर्वीचे लोक हा सण साजरा करत होते. त्यामुळे संक्रांत हा खरंतर अगदी शुभ सणच आहे. याला अजिबात निगेटिव्ह दृष्टीने बघू नका. थंडीपासून सावध राहा आणि तिळगुळाची वडी खात राहा.

तर वर्सटाईल परिवाराकडून तुम्हाला व संपूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!! 💐💐

"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!"😃☺️

तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

Facebook Page - Versatile Educaare System

Facebook Group - PRAGYAKULAM



याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments