वाचन करण्याचे ५ जबरदस्त फायदे!!

" वाचाल तर वाचाल " ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रसिद्ध ओळ आपण सर्वजण नेहमी ऐकत आलेलो आहोत. पण वाचन करताना काही जणांना झोप येते, कंटाळा येतो. मग तरीही इतके मोठे मोठे लोक वाचनाला एवढे महत्त्व का देतात? ज्या वेळेस आपण कोणत्याही ज्ञानी माणसाचे चरित्र वाचतो किंवा ऐकतो तर त्यामध्ये त्यांनी वाचनाला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. आपण लहानपणापासून आजपर्यंत शाळेत असताना शिक्षक आणि घरी आई बाबा सुद्धा आपल्याला वाचन कर म्हणून हट्ट करत असतात किंवा सल्ला देत असतात. नक्की या वाचनाने होते तरी काय? हे जाणून घ्यायचे आहे का? तर हा ब्लॉग तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देईल. चला तर मग सूरूवात करूया.


नमस्कार मी श्रुती कांबळे Versatile Educaare System ची टीम मेंबर, तुम्हाला वाचन का केले पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती या ब्लॉग मधून देणार आहे. खूप जणांनी मला सांगितले की वाचन करणे ही खूप कंटाळवाणी गोष्ट आहे. वाचन करताना खूप झोप येते. जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा माझा अनुभव सुद्धा अगदी असाच होता. पण ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टीचा  "Why" म्हणजे "का" स्पष्ट नसतो त्या वेळेपर्यंत या गोष्टी होतात. पण तो "Why" आपल्याला ज्या वेळेस स्पष्ट होतो तेव्हा सगळ्या गोष्टी छंद बनतात. आपण शाळेत असताना आपल्याला वाचन करा, वाचन करा सांगितले जाते. पण खूप कमी वेळा आपल्याला वाचन का करावे याची माहिती दिली जाते. वाचन का करावे हेच स्पष्ट नसल्यामुळे आणि पायथागोरस प्रमेय, अल्फा, थिटा अशा गोष्टी पाहून पाहून पुस्तकावरील प्रेम कमी होऊ लागते. जेव्हा या पलीकडे जाऊन पुस्तके कशा प्रकारे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतात हे समजेल तेव्हा ती आपल्याला आवडायला लागतील.
               
पुस्तके ही ज्ञानाचे अखंड भांडार आहेत. लहान मुलांसाठी गोष्टी, गाणी ज्यामधून त्यांना काहीतरी तात्पर्य मिळेल अशी पुस्तके प्रकाशित करण्यात आलेली आहेत. ज्या लोकांना ज्या क्षेत्रात रस आहे त्या प्रकारची असंख्य पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात. काही पुस्तके फक्त मनोरंजनासाठी लिहिलेली असतात. अशा प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक बाबींसाठी पुस्तके प्रकाशित करण्यात आलेली आहेत. आज आपण पाहतो की सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने मिळतात. तरीसुद्धा पेपर, मासिके यांचा खप कमी झालेला नाही. आजही कित्येक वाचनालये त्याच थाटात उभी आहेत. आजही कित्येक लोक ज्ञानार्जन करण्यासाठी हातात पुस्तक घेऊन वाचत बसलेली असतात. तसेच काही लोक जे पुस्तक मिळत नाही त्याची ऑनलाईन कॉपी घेऊन वाचतात. 
आता या वाचनाचे असंख्य फायदे आहेत त्यापैकी काही फायदे आपण पाहुयात. 

१) वाचनामुळे ज्ञान वाढते -
ही गोष्ट तर आपणा सर्वांना माहीत आहे की खूप दिग्गज लोकांनी त्यांच्या अनुभवावरून आणि ज्ञानावरून खूप पुस्तके लिहून ठेवलेली आहेत . आपण जर त्यांनी लिहून ठेवलेले विचार वाचायला सुरुवात केली तर त्यांच्याप्रमाणे आपले ज्ञान वाढीस लागते आणि एक विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे धनी होतो. जगात खूप विद्वान लोक होऊन गेले आणि खूप विद्वान लोक आहेत पण सर्व लोकांचे ज्ञान आपण एका ठिकाणी बसून कसे शिकू शकतो तर ते फक्त वाचन करून. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील संपूर्ण माहिती आपण पुस्तकांचे वाचन करून मिळवू शकतो.
 
२) व्यक्ती मानसिक व बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ होतो - वाचन केल्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत वाढ होते. व्यक्तीची स्थिरता वाढू लागते. चूक काय बरोबर काय हे समजून घेऊन तो बोलू व वागू लागतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात त्याला खूप मदत होते. जर मन चंचल असेल तर निर्णय खूप वेळा चुकतात पण वाचन सर्व प्रकारे व्यक्तीला परिपूर्ण बनवण्यास मदत करते. यामुळे व्यक्तीचे स्वतःचे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व बनते.
 
३) शब्द संपदा वाढते - एखादी गोष्ट बोलायची किंवा व्यक्त करायची असेल तर योग्य शब्द माहित असणे आवश्यक असते. तसेच खूप ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला चांगली शब्द संपदा असणे गरजेचे आहे. अवांतर वाचनामुळे आपली शब्द संपदा वाढते. ज्याचा उपयोग आपण भरपूर ठिकाणी करू शकतो. उत्तम शब्द संपदेमुळे उत्तम व्यक्तिमत्वाची ओळख होते. वेगवेगळ्या भाषेचे नवीन शब्द वाचनात आल्यामुळे आपली शब्द संपदा वाढते. 

४) तणाव कमी होतो - 
जसे दररोज व्यायाम केल्याने शरीर सदृढ राहते तसेच मेंदूच्या व्यायामासाठी वाचन गरजेचे आहे. नियमित वाचन केल्यामुळे मेंदू त्वरित सक्रीय होतो. जर आपण एखाद्या तणावग्रस्त परिस्थितीत असलो तर आपले निर्णय चुकतात. तोच ताण वाचनामुळे कमी होतो. व्यक्ती शांत आणि प्रसन्न होते. 

५) स्मरणशक्ती वाढते - 
वाचन करताना आपण अगदी एकाग्रतेने पुस्तक वाचतो. एखादे पुस्तक गोष्ट स्वरूपात लक्षात ठेवले जाते. त्याच्याशी निगडित एखादा प्रसंग घडला किंवा एखादा प्रश्न समोर आला तर लगेच तो मुद्दा आपल्याला आठवतो आणि उत्तर आपल्याला मिळते. खूप गोष्टी अभ्यासातील सहज लक्षात राहतात. काही पुस्तके आपण वाचून विसरून गेलेलो असतो पण परत ते पुस्तक वाचायला घेतल्यावर आपल्याला त्यातील ठळक गोष्टी लगेच आठवतात तसेच पुस्तकाचा सार आपल्या लक्षात येतो. यामुळे आपल्या स्मरण शक्तित खूप वाढ होते. 
                 
पुस्तके वाचल्याने आपण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य खूप चांगल्या प्रकारे सुधारू शकतो. मन शांत असल्यामुळे शांत झोप देखील लागते. ज्या प्रकारे अन्न खाल्लेले पोषण लगेच शरीरावर दिसत नाही पण त्याचे खूप खोल परिणाम जाणवतात. तसेच वाचनाचे परिणाम हे खूप खोल जाऊन आपल्या व्यक्तीमतत्वामध्ये दिसू लागतो. एक वेगळे व तेजस्वी व्यक्तिमत्त्व विकसित होते. यासाठी वाचन नक्की केले पाहिजे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला वाचन का केले पाहिजे म्हणजेच " का" चे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. शेवटी एकच सांगेन "वाचाल तर वाचाल ".

तर अश्याच अजून माहितीसाठी आपल्या Versatile Educaare System सोबत कनेक्टेड रहा.

तुमचा अनुभव व तुम्हाला ह्या विषयी जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा.
Versatile Educaare System च्या मदतीने तुम्हाला पडणाऱ्या कोणत्याही प्रश्नासाठी खलील माध्यमातून संपर्क साधावा : 

VERSATILE Facebook Page : Versatile Educaare System

PRAGYAKULAM Facebook Group : PRAGYAKULAM

VERSATILE YouTube : Versatile Educaare System


याचसोबत, Versatile Educaare System ने सुरू केलेल्या "Ankuram - Your Child's Self Discovery" च्या फ्री सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरित वरील माध्यमातून संपर्क साधा.

धन्यवाद!!

Comments

Post a Comment