"संस्काराचे विद्यापीठ !" ( भाग - १ )


       शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्कारांचे एक विद्यापीठ असते. विद्यार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक तयार करणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा खऱ्या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो. शिक्षणामध्ये शिक्षकाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. विद्यार्थ्याच्या मनातील अनेक भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकाच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वतःच्या आयुष्यात नैतिक मूल्यांचे आचरण करून समाजासमोर आदर्श ठेवणारे शिक्षक एका अर्थाने समाजाला घडविणारे शिल्पकार आहेत. 


       समाज निरोगी राहण्यास, समाजाची संवेदनशीलता टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक स्वरूपाची आहे. खरा शिक्षक विद्यार्थ्याच्या आयुष्यावर केवळ प्रभाव टाकत नाही तर त्याच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतो. शिक्षक विद्यार्थ्याच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास नेहमी सज्ज असला पाहिजे. जी भावीस्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेले असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असला पाहिजे. शिक्षकांचे काम हे मार्गदर्शन, समुपदेशक किंवा दिशादर्शक असे असते. 

       डॉ राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षकाची व्याख्या करताना म्हणतात; "शिक्षकाने कमीतकमी शिकवून विद्यार्थी स्वतः अधिक शिकेल यासाठी त्याला प्रशिक्षित केले पाहिजे !" सुप्रसिद्ध तत्वनेता जॉर्ज बर्नार्ड शॉ याने एके ठिकाणी म्हटले आहे कि " मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकांनी मारू नये, उलट त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा आहे." शिक्षकाने स्वतः शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणाऱ्याने सतत शिकत राहायला हवे ! त्यांची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये आणि महत्वाचे म्हणजे शिक्षकाने आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगायला हवे. 

      शिक्षक ही अशी व्यक्ती ज्याचं प्रत्येक काम हे फक्त काम नसून एक महत्वाची जबाबदारी आहे आणि ही जबबदारी पार पाडायची असेल तर नक्कीच आपल्यामध्ये योग्य शिक्षकाचे प्रत्येक गुण व कौशल्य असणं हे ही महत्वाचे आहे. मग ते गुण किंवा कौशल्य नक्की कोणते? याचं उत्तर तुम्हाला पुढच्या लेखात मिळेल. 

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद!

- धनश्री परब

Comments

Post a Comment