"बदल..!"


           संध्याकाळचे काम झाल्यावर जरा निवांत टेरेसवर जाऊन बसले होते. खूप गोड पक्षांचा किलबिलाट ऐकायला येत होता. शुद्ध आणि शांत वातावरण होत. मस्त थंड गार वारा सुटला होता.या सर्व गोष्टींचा आनंद घेत होते आणि अचानक समोर लक्ष गेलं तर तिकडे समोरच हिरवगार सुंदर झाड होत.झाडाला पाहून मनात विचार आला की कसं ना... थोड्या दिवस आधीच हे झाड पूर्ण सुकलेले आणि झाडाच्या फक्त फांद्या दिसत होत्या. आणि आज हे झाड अगदी हिरवगार भरलेलं, त्यावर पक्षांचे घरट. वाह..! किती हा बदल आणि केवढा मोठा हा बदल नाही का...


       बघा ना... निसर्गही बदलत आणि बदलाला स्वीकारत मात्र माणसांचं काय...?? खरचं आपण बदलाला स्विकारतो का...?? काही जणं स्वीकारत ही असतील.. आपण खूप वेळेला अस ऐकलं असेल की तू खूप बदलली आहेस मला तसा बदल म्हणायचं नाही आहे बरं का... माणसं बदलाला घाबरतात अस मला वाटत. कारण माणसांना एका ठराविक साच्यात म्हणजेच एका Comfort Zone मध्ये राहण्याची सवय झालेली असते. त्यांना माझं घर,माझे मित्र, माझा कुटुंब, माझी माणसं आणि हो आपण जसे आहोत त्यातच खूप समाधानी आहोत अस वाटत आणि म्हणूनच त्यांना बदल हा शब्दच आपल्या आयुष्यात आवडत नाही. मात्र न बदलताच, काहीच न करता आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत अशी इच्छा प्रचंड असते. किती मजेशीर आहे ना... यावरून अजय सरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली....
                 तुम्हा सर्वांना पक्ष्यांचा राजा कोण हे माहित असेलच,हो "गरुड". विशालकाय पंख, टोकदार चोच आणि धारदार पंजे ही त्याची वैशिष्ट्य.सर्व पक्षांमध्ये जास्त जगणारा हा पक्षी.जवळ जवळ ७० वर्ष असावा या पक्षाचे जीवन. पण हे ७० वर्ष जगण्यासाठी त्याला खूप खडतर परिस्थितीतून आणि मोठ्या बदलाला सामोरं जावं लागतं. वयाच्या ४० व्या वर्षीच या पक्षाची टोकदार चोच वाकडी झालेली असते. त्याचे धारदार पंजे कमकुवत झालेले असतात आणि विशालकाय पंख जाड व मोठे झालेले असतात. आणि त्यामुळे त्याला त्याची गरुड झेप घेणं कठीण होऊन जात व त्याची उपासमार होत असते. आता त्याच्याकडे दोनच पर्याय असतात. उपासमारीने मरण किंवा बदलाची प्रक्रिया. पण ही बदलाची प्रक्रिया म्हणजे गरुडाचा पुनर्जन्म म्हणता येईल, कारण यात असंख्य वेदना त्याला सहन कराव्या लागतात. तो त्याच्या या वेळेत पर्वत शिखरांवर आपलं एक घरट बनवतो.तिथे तो आपली चोच दगडावर घासून घासून तोडून टाकतो. या क्षणाला तो अगदी रक्तबंबाळ झालेला असतो परंतु त्याच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. तो आपली नवीन चोच येण्याची वाट पाहत असतो. नवीन चोच आल्यावर तो त्या टोकदार चोचेने आपली पंजांची नखे खेचून मुळासकट तोडून टाकतो. काही दिवसांनी नखे ही परत येतात. आणि मग तो आपल्या टोकदार चोच व धारदर पंजांनी आपले पंख ही काडू लागतो. आणि ती नवीन येण्याची वाट पाहत असतो. हा बदल करत असताना त्याला किती त्रास होत असावा पण तरीही तो हा बदल स्विकारतो. या कठीण बदलाच्या प्रक्रियेत शिकारी न करता आल्यामुळे उपाशी ही असतो.असा हा बदलाचा १५० दिवसांचा कालावधी घालवल्यानंतर तो परत तरुण झालेला असतो.आता तो परत त्याच उम्मिदीने आणि त्याचा त्याच दहशदीने तो पुढचे ३० वर्ष आनंदाने जगत असतो. स्वतःची उंचच उंच गरुड झेप घेत असतो आणि म्हणूनच खरोखर तो पक्षांचा राजा आहे अस म्हणाव लागेल. कारण खरच तो एखाद्या राजा सारखा अत्यंत खंबीरपणे, धेर्याने आणि स्वतः हा वेदनादायक बदल स्वतः त घडवून आणतो. आणि हे सर्व करत असताना तो कमालीचे धाडस,चिकाटी व सहनशक्ती ही दाखवतो. आहे ना कमालीची शिकवण या गोष्टीतून... 

              आपल्याला नव्याने जगण्यासाठी आणि जगण्यालायक बनण्यासाठी प्रत्येक परिस्थितीत बदल हा घडवून आणवाच लागतो. म्हणून त्रासदायक वाटले तरीही गरुडा सारखं धीट होऊन न घाबरता आपल्याला बदल हा स्वीकारला पाहिजे. माहित आहे हे बोलण्यासाठी सोप्प आहे पण जर निसर्ग, प्राणी आणि पक्षी जर बदल करू शकतात तर मात्र मग आपण ही नक्कीच करू शकतो.परंतु आपल्या आयुष्यात घडणारा कोणताही बदल चटकन न स्विकारण्याची माणसांची मूळ प्रवृत्ती असते.बदल हा नेहमीच अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असला तरी बदल हा तणावपूर्ण असतो अस आपल्याला वाटत असतं.म्हणजे अस की,आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटतं राहते की बदल जरी चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणत राहतो.तुम्हाला माहीत असेलच जस फुलपाखराला आपला नवीन जन्म घेण्यासाठी एक कठोर बदल करावा लागतो. त्याला स्वतःला त्याच्या कोशातून बाहेर पडावं लागतं. जर का त्याला कोणी मदत केलीच तर या बदलाच्या प्रक्रियेत त्याचा मृत्यू होतो. पण तो स्वतः हा बदल घडवून आणतो आणि आपल्या नवीन पंखांनी या फुलावरून त्या फुलावर बागडत असतो. अगदी तसच आपल्याला सुद्धा स्वतचं स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे तेव्हाच तर आपण आपला नवीन जन्म घेऊ शकतो, नवीन जोशात आणि आनंदात बागडू शकतो, अगदी त्या फुलपाखरू सारखं...

        जर आपल्याला बदल हे मोठे आणि कठीण वाटतं असतील तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून बदलाला सुरुवात करा.सुरुवातीला कठीण वाटेल पण नंतर नक्की जमेल. तुमचा रोजचा चहाचा कप कधी तरी बदला, तुमचा नेहमीचा ठरलेला जेवणाचा तोच ताट आणि तीच जागा बदला,रोजच्या वेळेपेक्षा कधी तरी लवकर उठा, तुमचा रोजचा दिनक्रम केव्हा तरी बदला आणि बघा मग कमाल...
बदल हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि जर का तो आपण केला तर आपण देखील नक्कीच एक गरुड झेप घेऊ शकतो नाही का...!!

धन्यवाद!

- जया सकपाळ.

Comments

Post a Comment