"देणाऱ्याने देत जावे..!"

         सिंधुताई सपकाळ म्हणतात, "तुम्हाला दोन हात आहेत, एकाचा वापर स्वतःची मदत करण्यासाठी करा आणि दुसरा हात इतरांना मदत करण्यासाठी वापरा".


           आपण प्रत्येकाने लहान - सहान मदत गरजू व्यक्तींना आता पर्यंत केली असेल किंवा करत असतो. जसे की चुकणाऱ्याला योग्य रस्ता दाखवणे, अंध व्यक्तीला रस्ता ओलांडून देणे, रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना खायला देणे, अशी मदत केल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो, कारण कोणाचे तरी चांगले आशीर्वाद आपल्याला मिळतात, ही भावनाच किती मौल्यवान आहे.
         मी सुद्धा एकदा अशीच छोटीशी मदत केली आणि त्यातून खूप काही शिकले. काही ७-८ रस्त्यावर राहणाऱ्या लहान गरजू मुलांना मी एकदा भेटले होते. एका प्रोजेक्ट दरम्यान मी त्यांना भेट दिली होती. त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना जमेल तेवढी मदत करणे हा माझा त्यावेळेस हेतू होता. पण त्या दिवशी त्या लहान ४-७ वर्षाच्या गटामधील असलेल्या मुलांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांना त्यांच्या अडचणी विचारल्यावर , मला असं कळलं की त्यांना प्यायला पाणी व्यवस्थित मिळत नाही. तेव्हा त्यांना पाण्याची सोय करून दिली. त्यावेळेस मी चक्क झाले कारण ती मुलं पाण्यासाठी अक्षरशः भांडत होती. आणि त्यांना तसं पाहून एक विचार मनात धुडघुस घालू लागला , कधी कधी भर उन्हात रस्त्यावर चालताना आपल्याला तहान लागली की आपण पाण्याला महत्त्व न देता cold drinks, juices यांच्यावर सहज खर्च करतो. पण त्या मुलांसाठी cold drinks, juices सगळं काही पाणीच आहे, असं मला जाणवलं. आपला समज असतो की, अश्या मुलांना शिकण्याची इच्छा नसते आणि असं असेलही कदाचित. कारण त्यांना लहान वयात शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जात नाही, किंवा योग्य वळण लावणारी माणसं त्यांच्या जवळ नसतात.
             मी त्यांच्या सोबत फक्त थोडा वेळ घालवला, पण त्यांचा आनंद बघण्यासरखा होता. कारण ती मुलं संपूर्ण दिवस एकटे असतात आणि त्यांच्यासोबत बाहेरची नवीन व्यक्ती येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवते, ही गोष्टच त्यांच्यासाठी आनंदमय होती. यांना भेटण्या अगोदर बरच काही मला सांगण्यात आलं होतं की , ही रस्त्यावरची मुलं खूप हट्टी असतात, मागे लागतात. हट्टीपणा तर सगळ्याच लहान मुलांमध्ये असतो. जर मी या कारणांना घाबरून ह्या मुलांना भेटले नसते तर खरा आनंद मला अनुभवता आलाच नसता. अशी ही मदत मी पहिल्यांदाच केली, आणि ती माझ्या नेहमीच आठवणीत राहील.
         मित्रांनो, अशीच छोटी मोठी मदत आपण सर्वच करत राहूयात आणि अश्या गरजू लोकांकडून शिकत राहूयात. आपण कितीही छोटी मदत केली तरीही गरजूंसाठी ती खूप मोठी मदत ठरते. तुम्ही सर्वांनीच अशी मदत केली असेल, तुमचा अनुभव नक्की share करा.

Comments