"असं घडायचं होतं !"



        माणसांना नेहमीच बरेचसे प्रश्न पडतात. कधी भविष्याबद्दल, कधी वर्तमानाबद्दल, तर कधी भूतकाळाबद्दल सुद्धा प्रश्न पडत असतात. आपलं आयुष्य हे अशाच प्रश्नांनी भरलेलं असतं. आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण शोधतच असतो . सगळ्यां साठीचे हे प्रश्न वेगवेगळे असतात. पण एक प्रश्न असा आहे जो सगळ्यांना आयुष्यात कधी ना कधी पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे "हे माझ्या सोबतच का होतंय ?"


        तुम्हालाही बऱ्याच वेळा हा प्रश्न पडला असेल ! हो ना...! पण एक गम्मत सांगू का ? हा प्रश्न आपल्याला कधी पडतो बर !! हो अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. हा प्रश्न नेहमी आपण जेव्हा एखाद्या अडचणीत असतो किंवा आपल्या सोबत काही वाईट घडत असत तेव्हाच पडतो. असं का बरं होत असेल ? कारण एकच, की आपल्याला अडचणी दिसल्या की आपल्याला वाटत हे वाईट जे काही होतंय ते फक्त आपल्याच सोबत होतंय. म्हणजे ह्या जगात आपल्याला सोडून सगळेच सुखी आहेत. पण हाच प्रश्न आपल्याला तेव्हा पडत नाही जेव्हा आपण खूप खुश असतो आणि आपल्या सोबत सगळ छान होत. कारण आपल्याला आपल्या आयुष्यातलं दुःखच मोठं वाटत असतं. आनंदात आपण तितका विचार करत नाहीत. 

       ह्या धावणाऱ्या जगात फक्त दुःख नाही तर आनंद पण आहे तरीही आपल लक्ष फक्त दुःखा कडे असत. कधीतरी स्वतः हून मज्जा घेऊन बघा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी तुमच्या समोर रोज होत असतात पण आपण त्यांच्या कडे न बघता फक्त दुःखा कडे बघतो. का होत असावं असं ?? माणसाला स्वतःच दुःख तोपर्यंत मोठं वाटतं जोपर्यंत समोरच्या व्यक्तीची व्यथा त्याला कळत नाही. 

         त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. हसणाऱ्या मनसोक्त खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघा मुला, शाळा सुटल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर घरी जाण्याची जी उत्सुकता दिसेल त्याने नकळतच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, कॉलेज मध्ये एकत्र बसून कट्ट्यावर गप्पा मारणाऱ्या एखाद्या ग्रुपकडे बघा जगाचं सगळं भान एकीकडे आणि त्यांची मस्ती, आणि एकमेकांसोबत सुरू असलेल्या गप्पा ऐकताना तुम्हाला नकळत तुमचं कॉलेपासून च्या कितीतरी अंधुक आठवणी आठवतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सुखरूप घरी जाता तेव्हा तुमच्या घरातल्या कडे बघा.. तुम्ही आलेल्याचा उत्साह त्या निरागस चेहऱ्यांवर साफ दिसेल....!!

       आयुष्य हे खूप सुंदर आहे, प्रश्न विचारून त्यातली गम्मत हरवू नका. किमान "माझ्या सोबतच हे का होतंय !!" हा प्रश्न स्वतःला विचारू नका. आणि त्यासाठी स्वतः कडे आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदला म्हणजे आनंदी व्हाल..!

- सुषमा यादव

Comments