"सवयी" यशस्वी लोकांच्या...!

नमस्कार मित्रांनो,
       नेहमी प्रमाणे आज देखील आजूबाजूला चाललेल्या गोष्टी मुळे माझ्या डोक्यात विचार चालू होते की नक्की यशस्वी कसं होता येईल...?? कारण आजकाल सर्वांनाच आपल्या आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असतं. बऱ्याच जणांना यशस्वी झालेल्या लोकांना पाहून अस वाटत की यशस्वी होणं फारच सोप्प आहे, ते जणू काही एका रात्रीतच यशस्वी झाले आहेत आणि हा सर्व त्यांचा नशिबाचा खेळ आहे जो आमच्या नशिबातच नाही आहे अस त्यांना वाटतं. पण त्या साठी यशस्वी लोकांनी केलेले त्यांची मेहनत लगेच लोकांना दिसत नाही हो ना...?? यशस्वी होणं इतकं सोप्पं असतं तर आज सर्वचजण यशस्वी झाले असते नाही का...?? असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी नाही, खरं तर यशस्वी होणं सोप्प आहे आणि आपण सर्व यशस्वी देखील होऊ शकतो. फक्त हेच असतं की सर्वांना यशस्वी व्हायचं तर असतच पण यशस्वी होण्यासाठी मेहनत मात्र करायची नसते. तर सांगा आता तुम्हीच हे योग्य आहे का ते...?? नाही ना...! मग असं नक्की काय करावं लागेल जे यशस्वी लोकं करतात...?



        तर वेगळं अस काही नाही यशस्वी लोक सुद्धा तेच करतात जे आपण करतो फक्त फरक इतकाच आहे की ते वेगळ्या पद्धतीने करतात. तर मग सुरुवात करूया यशस्वी लोकांच्या पहिल्या गोष्टी पासून आणि त्या म्हणजे त्यांचा सवयी..चांगल्या सवयी या बद्दल तर आपण खूप ऐकलं असेल अगदी लहान पणा पासून आणि तेही सर्वांच्या तोंडून पण प्रश्न असा आहे की नक्की या सवयी आपल्या अंगी लावायचा कशा...?? आणि नक्की या चांगल्या सवयी नेमक्या कोणत्या..??

    सर्वात प्रथम म्हणजे स्पष्टता. आपल्याला प्रत्येक गोष्टीची स्पष्टता हवी जस की आपलं ध्येय काय आहे..?? आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात काय करायचं आहे आणि यासाठी रोज स्वतःशी बोलून,स्वतःला प्रश्न विचारून स्पष्टता मिळवणे हे यशस्वी लोकांचे कौशल्य असतं अस म्हणा.

     दुसरी सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. तुम्ही जर यशस्वी लोकांची दिनचर्या पाहिली तर तुम्हाला ही सवय नक्की पाहायला मिळेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळी लवकर उठून करायचं काय..?? तर तुमचा दिवसातला सकाळचा एक तास खूप महत्वाचा असतो या वेळेत तुम्ही व्यायाम,वाचन, ध्यान (Meditation) यासारख्या गोष्टी करू शकता कारण तुमचा सकाळचा एक तास ठरवतो की तुमचा दिवस कसा जाणार आहे आणि हेच तुमचे दिवस ठरवतात की तुमचे आयुष्य कसे जाणार आहे ते...आता सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे पण तितकेच गरजेचे आहे कारण झोप पूर्ण होणे आवश्यक आहे.

     तिसरी सवय म्हणजे वाचन. आमचे अजय सर नेहमी म्हणतात की तुम्ही पाच वर्षानंतर किती यशस्वी असाल हे तुम्ही कोणती पुस्तके वाचता आणि तुम्ही कोणत्या माणसांसोबत वेळ घालवता यावरून कळतं म्हणून वाचन करून ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. कित्येक वर्षाचा लेखकांचा अनुभव काही तासांच्या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला अनुभवायला मिळतो. किती सुदंर आहे ना.. !

       चौथी सवय म्हणजे स्वयं शिस्त. यशस्वी लोक नेहमी स्वतः च्या वेळेचे नियोजन करतात आणि ते काटेकोरपणे पाळतात. ते कधीच स्वतःला सुट देत नाहीत. उठल्यापासून ते झोपेपर्यंत, जेवणापासून ते फिरण्यापर्यंत, कोणाला भेटायचं, काय शिकायचं इतकंच नाही तर त्यांनी स्वतचं दिवसाचं, आठवड्याच, वर्षाचं आणि पुढील पाच वर्षाचे वेळापत्रक हे आधीच बनवलेलं असतं आणि त्यामुळेच त्यांचा कामात अचूकता असते.

        पाचवी आणि महत्वाची सवय म्हणजे जबाबदारी घेणं. यशस्वी लोक नेहमी आपल्या अपयशासाठी स्वतःलाच जबाबदार मानतात. ते प्रत्येक परिस्थितीची जबाबदारी स्वतः घेतात. तर या आहेत यशस्वी लोकांच्या पाच सवयी.

       लक्षात ठेवा माणूस हा सवयींचा गुलाम असतो जर तुमच्या सवयी चुकीच्या असतील तर तुम्ही अधोगतीचा मार्ग निवडला आहात आणि जर तुमच्या सवयी योग्य असतील तर तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आता निर्णय तुमचा आहे की आपल्याला नक्की कोणत्या सवयी लावायच्या आहेत.

भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटलं आहे की "तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी नक्की बदलू शकता कारण आपल्या सवयी मध्ये इतकी ताकद आहे की त्या आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतात."

आता वेळ आहे तर विचार करा आणि बदला आपल्या सवयी...!

धन्यवाद...!

- जया सकपाळ





Comments

Post a Comment