"बाबांची महोदया"

 सूर्यप्रकाश.... सूर्यप्रकाश असावा तो, किंवा मग कुणीतरी डोळ्यांवर टॉर्च मारावी आणि त्या क्षणात आलेल्या प्रकाशाने डोळे मिटावेत आणि तरीही मिटलेल्या डोळ्यांना जाणवावा असा प्रकाश होता तो. नक्की काय होतं हे तिचं तिलाही सांगता आलं नसतं पण काहीतरी वेगळं होतं....


     तिने डोळे उघडले, चेहऱ्यावरचं हसू अजुनही तसच होतं.जणू अजूनही ती स्वप्नातच होती बहुतेक. हात वर करून मोठा आळस दिला तिने. सुटलेले केस नीट बांधले... पुन्हा झोपावस वाटत होतं जसं तो बेड वाटच पाहत होता तिची.... स्वतःच्याच विचारांवर हसत ती उठली. आरशासमोर उभी राहिली... आणि न्याहाळत राहिली तशीच स्वतःला बराच वेळ. कितीतरी दिवसांनी किंबहुना कितीतरी महिन्यांनी स्वतः ला सापडली होती ती... आणि बहुदा ही संधी तिला गमवायची नव्हती... तिला पुन्हा एकदा स्वतःच्या विचारांवर हसू आलं.... तिला आठवलं... तिच्या अशाच विचारांमुळे तिचे बाबा तिला नेहमी "महोदया" म्हणायचे....तसं फारसं काही लॉजिक नव्हत...पण तिला लेखिका म्हंटलेल फारस आवडत नव्हतं, तिच्या मते...स्वतःच्या भावनांना शब्दात मांडणं म्हणजे काही माणूस लेखक होत नाही.... "ठीकेय मग... लेखिका नको तर महोदय म्हणतो.." बाबाच्या त्या वाक्यावर फार हसली होती ती... अगदी मनमोकळेपणे... आणि मग सुरू झाला होता तो खेळ... "महोदया आटोपलं का..? चा... गतकाळातल्या आठवणींनी तिला उगाच हिरमुसल्या सारखं झालं... पण ह्या वेळेस ती रडली नाही... तिने मोठा श्वास घेतला.... असच स्वतःला पुन्हा एकदा न्याहाळलं आणि बाहेर खिडकीत आली.....
       आजूबाजूला दूर दूर पर्यंत फक्त झाडं होती, गर्द हिरवी गार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट मनाला शांत करत होता, सकाळची थंडगार हवा, शरीराला दिलासा देत होती.... आणि सूर्याची ती कोवळी किरणं तिच्या त्या हसऱ्या गुलाबी गालांसोबत खेळत होती.... ती आत आली अंगावर स्वेटर चढूवून दारात बांधलेल्या रशीवरून तिने खाली उडी टाकली... सवय तुटल्या मुळे तिला तोल सांभाळताच नाही आला स्वतःचा. आणि ती धाडदिशी खाली आपटली... आता जर इथे बाबा असता... तर धावत आला असता... "काय झालं.. फार लागलंय का ??तू बरी आहेस ना.. ?" अशा कितीतरी प्रश्नांनी त्याने फायरिंग केली असती... बाबाच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. ती उठली आणि मागे जाऊन एका दगडावर बसली...बराच वेळ... समोर असलेलं ट्री हाऊस तिच्या बाबाने तिला ती चौथीला असताना गिफ्ट केलें होत.. ते हॉलिवुड मुविस मध्ये असत तसं हवं होतं तिला.... सेम तसंच. किती हट्टी होती ती लहान असताना, पुन्हा एकदा ती आठवणींच्या पायऱ्या चढून भूतकाळात हरवत होती. किती गमतीदार गोष्ट आहे ना, जेव्हा खरच तो क्षण प्रत्यक्षात घडत असतो त्यावेळी त्याची फारशी किंमत नसते आपल्याला...आणि तोच क्षण जेव्हा भूतकाळाच्या नुकत्याच पलटलेल्या पानावर लिहिला जातो तेव्हा वाटतं राहतं की सतत वाचत राहावा तो क्षण.
वेळेनुसार कोणतीच गोष्ट सारखी राहत नाही हेच खरं.... ती स्वतः किती बदलली होती... हे बहुदा तिला स्वतःलाही सांगता आलं नसतं. पण प्रत्येकच जण बदलत असतो त्यात मोठी गोष्ट ती काय... पण तिला माहित होतं तिची गोष्ट मोठी नसली तरी वेगळी आहे.... ज्यावेळेस ती शाळेत पहिल्यांदा फेल झाली होती आणि सगळ्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. तसं ती कधी फार हुशार अशी नव्हतीच पण फेल होऊन तिने काहीतरी मोठी चूक केलिये असच जाणवलं तिला त्या वेळी आणि मग बदलली ती..., मुद्दाम नाही पण बदलली...आणि मग नंतर जणू संपूर्ण जगभरच बॅडलक तिला येऊन चिकटलं... हळू हळू फ्रेंडस सोडून गेले मग... स्कूल बदलली... नवीन जागा नवीन शाळा... आणि नवीन ती... पण हे सगळं तिला भावत नव्हतं... पटत नव्हतं.... काहीतरी चुकतंय..? काहीतरी विचित्र आहे..? असे कितीतरी प्रश्न सतत तिच्या डोक्यात घोंघावत.... आणि ती पळ काढत प्रश्नांतून, माणसांतून परिस्थितीतून.... शिक्षण पूर्ण करून ती लंडनला गेली, तिथे कंटेंट रायटींग साठी जॉब आला होता तिला. खर तर तिचं मन नव्हतं लागत तिथे, पण रोज बाबासोबत होणाऱ्या भांडणाने वैतागली होती ती... आई गेल्यावर त्यानेच संभाळल होतं तिला... त्याला दुखवायचं नव्हतं... म्हणून गेली. पण संपूर्ण जगाचं बॅडलक सोबत घेऊनच... कारण ती जॉईन झाली आणि तिसऱ्याच महिन्यात कंपनी लॉस मध्ये गेली.... ह्या दरम्यान बरेचसे ब्रेकअप आणि कसं बंस जमलेले लग्न सुद्धा तुटलं होतच तिचं... डिप्रेशन होत की काय माहित नाही... पण ती जे अनुभवत होती भोगत होती ते वाईट होतं, फार फार वाईट.... आणि आता इथून पुढे जाण्याची ताकद नव्हती तिच्यात...
       त्या रात्री १२:३० वाजले होते... नदीच्या त्या ब्रिजवर ती एकटीच होती... आणि तिचा निर्णय ठाम होता... तिचे हात पाय थरतरत होते... आतापर्यंतच संपूर्ण आयुष्य एखाद्या मूवी सारखं तिच्या डोळ्यांसमोरून जात होतं.... तिची हिम्मत होत नव्हती... पण निर्णय पक्का होता. तिने मोठा श्वास घेतला आणि ती उडी मारणार......इतक्यात मागून अॅना धावत आली... "तुझे बाबा... तुझे बाबा... " अॅना रडत इतकंच बोलली आणि तिचा तोल सटकला आणि ती त्या उंच अशा ब्रीज वरून खोलवर पाण्यात गुडूप झाली.
तिने डोळे उघडले तेच हॉस्पिटल मध्ये... तोपर्यंत तिचे बाबा हे जग सोडून गेले होते... ती हरवली होती कुठेतरी... रात्री भरघोस दारू प्यायल्यावर होतो तशा हँगओवर मध्ये होती...बहुतेक. ती तिच्या बाबाच्या घरापर्यंत कशी आली, कधी आली ! तिला काहीच आठवत नव्हतं... घरी आल्यावर धूळ बसलेल्या त्या घरात कितीतरी दिवस भुतांसारखी राहिली ती . मग हळू हळू स्वतः ला सावरलं जगणं शिकू लागली... किंवा एखाद्या सेल वर चालणाऱ्या यंत्रासारखं जगू लागली... कंपनी मधून सतत कॉल येत होते.... रीलेटिवस सतत विचारपूस करत होते... आणि ती टाळत होती सगळ्यांना, जसं पूर्वी टाळायची... उत्तरं तरी काय देणार होती... तिच्याकडे नव्हतेच काही... तिने ते घर विकण्याचा निर्णय घेतला. डिलर सोबत बोलणे झाले... घर खाली करायचं म्हणून ते आवरताना तिला एक बॉक्स सापडला.. बाबाच्या खोलीत... तिने तो खोलला. त्यात बऱ्याच जुन्या गोष्टी होत्या जपून ठेवलेल्या... तिचे पहिले वाहिले शुस, तिची डायरी, तिचा पहिला फोटो.... एक छोटी गाडी जी तिची फार आवडती होती आणि एक चावी... ट्री हाऊस ची चावी... बाबाने इतके वर्ष तिचं ट्री हाऊस जपलं होतं आणि ती... ती निघाली होती विकायला तिच्या बाबाचं एकुलत एक घर.... तिला राग येऊ लागला स्वतःचा, त्रास होत होता... पुन्हा एकदा विचारांचा गोंधळ.... आणि इतक्यात तिला ती डायरी सापडली जी फार पूर्वी हरवली होती तिच्याकडून. फार शोधली होती तिने पण सापडली नव्हती... आज सापडली... बाबाच्या खोलीत म्हणजे बाबाने....!! तिने ती खोलली... त्यात तिने तिची पाहिली कविता लिहिली होती.... आणि खाली एक नोट होतं बाबांनी लिहिलेलं बहुतेक... त्यावर लिहिलं होतं "तुझं पाहिलं लिखाण बेटा... आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जपेन मी हे... माझं बाळ आज मोठं झालं ते स्वतःच्या भावना असं शब्दात मांडू लागलंय... आज इतका खुश मी कधीच नव्हतो... माझी बेटा.... माझी लेखिका..... "
        कितीतरी दिवसांनी ती धायमोकळून रडली.... तिने ती डायरी पूर्ण वाचली त्यात तिच्या आयुष्यातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट दडली होती... तिचं फेल होण सुद्धा आणि पुढे लिहिलं होतं "काँग्रॅट्स महोदया... आज शाळेतल्या परीक्षेत फेल झालीस पण आयुष्याच्या परीक्षेत पास झालीस... आणि नेहमीच होशील..." तिचा बाबा सुद्धा तिच्यासारखाच होता तर... नेहमीच अव्यक्त... इतर हजार गोष्टी बोलणारा पण मनातलं...?? काश की बाबाने हे सगळं तिला आधी सांगितलं असतं...!! काश त्याने तिला थांबवलं असत...!! पण आता वेळ निघून गेली होती तिने ती पूर्ण डायरी वाचून काढली डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होत. "We do not remember days, we remember moments".... "Enjoy an every little moment...my dear..." तिने मोठा श्वास घेतला... आणि त्या दगडावरून उठली... डोळ्यात साचलेलं पाणी आणि चेहऱ्यावरचं मंद हसू तिला आणखीच सुंदर दर्शवत होतं. बाबाची ती डायरी वाचायला तिला उशीर झाला होता.... खूपच उशीर.. पण आता पुन्हा झालेले धडे गिरवण्यात अर्थ नव्हता... तिला ह्या जंगलात येऊन आज १७ दिवस पूर्ण झाले होते... इंटरनेट फोन, मेल, मेसेजेस आणि रोजचं तेच धक्काधक्कीच आयुष्य सोडून ती इथे निवांत जगायला शिकली होती... स्वतःवर प्रेम करायला शिकली होती.... 'इतरांना खुश ठेवताना, इतरांवर भरभरून प्रेम लुटताना कधीच कमी न करणारे आपण, जेव्हा स्वतःवर प्रेम करायची वेळ येते तेव्हा इतका कंजूस पणा का करत असू...!?' ७ व्याच दिवशी हा प्रश्न पडला होता तिला... उत्तर अजुनही मिळालं नव्हतं पण आता ती ते शोधत ही नव्हती...सकाळी रोज स्वप्नात दिसणारा तो प्रकाश...तो प्रतीक होता... तिच्याकडे जगण्यासाठी आणखी एक दिवस आहे हे सांगण्यासाठी आणि ती ह्यातच खुश होती... बऱ्याच दिवसांनी इतका विचार केला होता तिने... 'पण चांगलय भूतकाळात सुद्धा मारवा कधीतरी फेर फटका... सकाळी सकाळी उठल्यावर मारतो तसा...' हा विचार डोक्यात आला...तसं तिला आठवलं तिने अजून कॉफी घेतली नाहीये.. मुंबईत असताना कॉफी शिवाय एकही दिवस जायचा नाही तिचा. तरी इथे आल्या नंतर बरेच दिवस तिने कॉफी घेतली नव्हती, पण एकदा सकाळी सकाळी फेरफटका मारत असतानाच जंगला बाहेरची एक फार जुनी टपरी तिला दिसली. तिथले आजोबा फार म्हातारे झाले होते, पण असही घरी जीव लागत नव्हता निदान प्रवास्यांना गरमागरम चहा पाजावा म्हणून सकाळीच ते तिथे येत. ती बऱ्याचदा त्यांच्याकडे जायची गप्पा मारायची. गरमागरम कॉफी घ्यायची आणि पुन्हा घरी निघून यायची. आजही ती धावतच जंगला बाहेर असलेल्या मोडकळीस आलेल्या त्याच टपरीवर गेली. एक कप गरमागरम कॉफी घेत आजोबांसोबत इकडच्या तिकडच्या काही गप्पा मारल्या आणि ती पुन्हा घरी आली... आज तिला उगाच तिचा फोन ऑन करावासा वाटला... तिने फोन ऑन केला आणि धडा धड मेसेजेस, नोटीफिकेशनस आणि बरेचसे मेल.. फोन बाजूला ठेवून ती अंघोळीला गेली... थोड्या वेळाने तिने फोन चेक केला... फ्रेंडस नातेवाईक.. कंपनी सगळ्यांचेच मेसेजेस, कॉल, मेल... तिने एक मेसेज ओपन केला... डिलर चा मेसेज होता... "What about the deal mam..?" तिने तो मेसेज पाहिला आणि त्यावर रिप्लाय दिला "it's cancel now I can't sold that house I'm sorry.. " तिला अचानक काहीतरी जाणवलं... तो सकाळचा प्रकाश झोत.. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं... तिने फोन वर एक मेसेज टाईप केला.. I'm sorry about my behaviour but I'm coming there at 21st of march Nd don't worry about any thing... I'm not going to leave job... That's what I wanted to do.. I wanted to write more and more.." तिने तिच्या कलिग ला मेसेज सेंड केला... आणि मस्त दुपारच्या भर उन्हात थंड वाऱ्याच्या सोबतीला... झाडांच्या सळसळत्या पानांच्या आवजासोबत ती गुणगुणत लिहायला बसली... तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं जे बाबा "महोदया" म्हंटल्यावर खुदकन यायचं....ती आता जगणं शिकली होती पण सेल वर चालणाऱ्या यंत्रासारखं नाही तर उंच आभाळात झेप घेणाऱ्या पक्ष्यासारखं.....

धन्यवाद !

- वर्षा वासुदेव







Comments

  1. Varsha kiti sundar lihilays khup Chan♥️ kiti Chan mandlays khup awadla all the best😊

    ReplyDelete
  2. Khup mast ....varsha 🤗🤗🤗🤗

    ReplyDelete
  3. he varshu mala vachatana litrally tujhshi bolat adlyacha bhas hot hota
    Keep it up baby all the best

    ReplyDelete
  4. Khup Chan Varsha...Keep it up...👍😊

    ReplyDelete

Post a Comment