"यश आणि अपयश"

 नमस्कार

'मन प्रसन्न असलं की कोणत्याही कामाचा त्राण वाटत नाही'. समोर येईल त्या कामात मग माणूस संधी शोधू लागतो. आणि मग असच कधीतरी अनेक संध्यांच सोनं होऊन माणूस यशाचं शिखर गाठतो. खरतर त्यावेळेस त्याचं त्याला सुद्धा नवल वाटत असतं की हे एवढं सगळं नेमकं झालं कधी आणि कसं, मग आश्चर्याचा धक्का थोडा ओसरला की त्याला आठवतात भूतकाळात विरून गेलेल्या काही आठवणी, पुसटशी अंधुक अशी काही चित्र डोळ्यांसमोरून जातात आणि मग स्वतःच्याच नकळत स्वतःवर, स्वतःच्या कामावर, सहकाऱ्यांवर भरभरून प्रेम येतं. आदर वाटतो, आपुलकी वाटते.... आणि मग शब्द सुचायचे बंद होऊन फक्त आसू वाहू लागतात......  पण ह्या निखळ वाहणाऱ्या पाण्यामागे, चेहऱ्यावर असलेल्या त्या अस्पष्ट अशा हसुमागे, कितीतरी तासांची, दिवसांची, महिन्यांची आणि अनेकदा वर्षांची मेहनत असते. कितीतरी अर्धवट झोपलेल्या रात्री आणि कामाच्या भारात दुपारचं विसरून गेलेल जेवण असतं. भर उन्हात केलेली अंग मेहनत असते तर रात्रीच्या कडाकीच्या थंडीत लॅपटोप समोर स्थिरावलेली नजर असते......
         स्वतःच्या जीवावर एकटं असताना उडी मारणं केव्हाही सोपच असतं पण आपल्यासोबत कितीतरी स्थिर - अस्थिर, ज्ञात - अज्ञात, लहान- मोठे सोबती असताना फक्त स्वतःचा विचार न करता त्या सगळ्यांचा विचार करताना अनेकदा स्वतःला सुद्धा विसराव लागतं. त्यांच्यातलाच एक व्हावं लागतं आणि असं झालं, असं करता आल तरच यशाचं शिखर गाठता येतं. हे शिखर काही सहजा - सहजी मिळत नाहीच खरतर; त्यासाठी चढाव्या लागतात अपयशाच्या असंख्य, अगिणत पायऱ्या.... मग अशा वेळेस कधी ठोकर खावी लागते, तर कधी आपल्या वाटणाऱ्या लोकांमधून कायमचं दूर व्हाव लागतं, कधी आवाजातला चढ-उतार वाढून संवादाचं वादात रूपांतर होतं, तर कधी सगळच दूर लोटून कुठेतरी लांब पळून जावंस वाटत... सकाळी चेहऱ्यावर खोटं हसू आण्यासाठी अनेकदा रात्री उशी ओली होऊन जाते आणि कधीतरी आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळूच शकणार नाही ह्या शंकेने मनात झाकळून येतं, मग सुरू होतं युद्ध स्वतः विरुद्ध स्वतःशीच..... पाहिलेलं स्वप्न, गाठायचं असलेलं ध्येय सहकाऱ्यांना दाखवताना कितीतरी दिवसांचे बलिदान द्यावे लागते. आणि तरीही त्या प्रत्येकाला त्याच उत्साहाने ते स्वप्न रंगवता येईल का ह्या भीतीने मन व्याकुळ होऊ लागते. मग सुरू होते धडपड.... एकच स्वप्न शेकडो, हजारो डोळ्यांना दाखवायची.... आणि मग बघताच बघता प्रतेकच जन त्या चित्रात रंग भरू लागतो आणि स्वप्नातलं ते चित्र कधीतरी अचानक वास्तवात उभ राहतं. ते चित्र आठवण करून देत असतं गाठलेल्या यशाची, आणि त्या चित्रामधला प्रत्येक रंग गोष्ट सांगत असतो अपयशाची... जसं रंगांशिवाय चित्र अपूर्ण राहतं, तसच काहीसं अपयशाच्या अनुभवांशिवाय यश अपूर्णच राहतं.  पण ज्या वेळेस स्वप्नरुपी चित्र
वेगवेगळे रंग भरून पूर्ण झालेलं असेल, त्यावेळेस तुम्ही असाल तुमच्या यशाच्या शिखरावर आणि निशब्द होऊन  डोळ्यात दाटलेल्या अश्रूनीच आभार मानत राहाल, स्वतःचे, स्वतःच्या कामाचे, स्वप्नाचे, त्यासाठी धपडणाऱ्या संघाचे आणि हो तिथपर्यंत पोहोचवणाऱ्या अपयशांच्या पायऱ्यांचे....

धन्यवाद!
VARSHA VASUDEV -- VERSATILE EDUCARE SYSTEM

Comments

  1. एकदम अप्रतिम लेख वर्षा मॅडम
    यश मिळवण्यासाठी अपयश पचवावा लागतो

    ReplyDelete

Post a Comment